मनोबल ४

आपल्या मनोबलाची जाणीव व त्याची व्याप्ती दर्शविणारे अजून एक सत्य .

या सृष्टीचा जन्म कसा झाला ? मांडुक्य उपनिषदात सांगितल्या प्रमाणे शून्यात एकवटलेल्या त्या संजीवक चैतन्यला इच्छा झाली कि आपण प्रकट व्हावे आणि आपली बहुविध रूपे अनुभवावीत. आणि तो मग महास्फोट झाला [ बिग बॅंग ]  त्यातून नाद व प्रकाश निर्माण झाले . त्यांच्या कंपनातून अनाहत ओंकार निर्माण झाला. ओंकारातून पंचमहाभूते निर्माण झाली. आकाश ,वायू ,अग्नी, जल व पृथ्वी व त्यातून सारी सृष्टी . आपणही निसर्गपुत्रच आहोत .याचाच अर्थ आपल्यातही पंचमहाभूतांचा अंश, गुण आणि शक्ती आहे. आपल्या शरीराचा अभ्यास केला तर प्रत्येक पेशीपेशीत अवकाश आहे. आपल्या मनाला आणि शब्दांना आकाशरूप म्हणतात. कारण मन आकाश व्यापू शकते आणि शब्दांचा जन्म अवकाशात होतो. श्वास रूपाने व पंचप्राणांच्या रूपाने प्राण ,अपान ,उदान , व्यान व समान अशी ज्यांची नवे आहेत ते वायू आहेत,  पोटामध्ये अन्नाचे पचन करणारा अग्नी आहे. रक्ताच्या रूपाने जल आहे आणि शरीरातल्या जडत्वाच्या ,हाडांच्या रूपाने पृथ्वी आहे. याचाच अर्थ आपणही पंचमहाभूतांनीच बनलेले आहोत. त्यांची सारी शक्ती ,गुणवैशिष्ट्य आपल्या मध्ये आहेतच . मग आपण सर्वसामान्य कसे , आपण हतबल का व्हावे ? आपल्या  मनाविषयी ,आपल्यात असणाऱ्या सामर्थ्या विषयी ही  इतकी शाश्वत प्रमाणं मिळाल्यावर आपण असे म्हणू शकतो का मी म्हणजे काय एक सर्वसामान्य ? अजिबातच नाही. असामान्यत्वाची सारी बीजे आपल्यातच खच्चून भरली आहेत.

तेव्हा आता तीन महत्वाची सत्य समोर आली.

1) एक म्हणजे या विश्वाच्या रहस्याचा भेद घेऊ शकणारे असे मन मला लाभले आहे

2) मी म्हणजेच विश्वरूप ऊर्जा आहे . सो हं … I am that energy

3) मी पंचमहाभूतांनी बनलेलो आहे. माझे व्यक्तित्व पंचमहाभूतांच्या शक्तीने, गुणवैशिष्टयांनी  भरलेलं आहे.

हे सिद्धांत जर आपण मनापासून स्वीकारले तर , आणि यांवर शांतपणे बसून चिंतन जर सुरु केले तर मी म्हणजे एक सर्वसामान्य आहे हा आपण धारण केलेला चुकीचा दृष्टिकोन गळून पडेल आणि ‘सो हं ‘ ही यथार्थता हळूहळू व्यक्तित्वात झिरपायला लागेल.

आता प्रश्न पडू शकतो की वरील दोन सिद्धांत आपण स्वीकायायचे कसे ? कारण तो काही आपला स्वानुभव नाही . तो दुसऱ्या कुणाचा आहे. मग त्यावर आपण कसा विश्वास ठेवायचा ?

अगदी सोपं आहे ते . लहानपणी नाही का आपण वडीलधाऱ्या माणसांचं बिनबोभाट ऐकायचो . शुभं करोति म्हणा , बाहेरून घरात येताना हातपाय धुऊन घरात या ,पाढे पाठ करा वगैरे वगैरे . तेव्हा आपण प्रश्न विचारले नाहीत . किंवा अगदी चिडचिड झाली तरी ते केल्याशिवाय पर्यायही नव्हता . पण नंतर मोठे झाल्यावर मात्र त्याचे फायदे आपल्याला कळले . अगदी तश्याच पद्धतीने विचार करायचा . हे सिद्धांत आपल्याच पूर्वजांनी , आपण ज्यांची गोत्र सांगतो त्यांनीच म्हणजेच आपल्याच वडिलधाऱयांनी सांगितली आहेत .ती त्यांनी अनुभवलेली आहेत .ती आपल्या भल्यासाठीच आहेत. मग त्यावर का बरे विश्वास नाही ठेवायचा ? का बरं त्यांना नाही स्वीकारायचे ?

तेव्हा सर्वप्रथम आपण विश्वाच्या रहस्याचा भेद करू शकणारे मन:सामर्थ्य माझ्याकडे आहे आणि  हे विश्व  चालविणारी ऊर्जा म्हणजेच मी  , सो हं , I AM THAT ENERGY  या दोन सिद्धांतांना मनोभावे  स्वीकारुयात . त्या सिद्धांतांचा संपूर्ण अर्थ जाणून घेऊयात . आणि मग या सध्याच्या निवांतपणाचा फायदा घेऊन सकाळी अथवा संध्याकाळी डोळे मिटून शांत बसून वरील दोन्ही सिद्धांतावर आपले चिंतन करूयात . त्याची प्राथमिक पायरी म्हणजे गाणं शिकताना जसे गुरूने सांगितलेला  पलटा शंभर वेळा घोकायला सांगतात तश्याच प्रकारे हे दोन सिद्धांत आपल्या मनाशी त्याच्या अर्थासकट अनेक वेळा उच्चारूयात. त्या अर्थाने मनात निर्माण होत असलेला बदल पाहुयात , त्यातल्या भावाशी समरस व्हायचा मनापासून प्रयत्न करूयात . सातत्यपूर्वक हे केल्याने लवकरच सुकलेल्या पानांसारखी सर्वसामान्य दृष्टिकोनामुळे येऊ पाहत असलेली हतबलता ,असहाय्यता गळून पडेल आणि त्या ठिकाणी सार्थ मनोबलाचे धुमारे फुटतील.

चला करून बघुयात . अनुभवू यात. अनुभव आल्यावर त्यावर नितांत अविचल श्रद्धा ठेवू यात. करून बघणे हाच खरा मंत्र आहे जो तुम्हाला ‘ माहित आहे’ च्या स्तरावरून ‘समजलं आहे ‘ या अत्यंत महत्वाच्या स्तरावर आणेल .एकदा का हा स्तर गाठला की  पुढचा श्रद्धेकडचा प्रवास आपसूकच सुरु होईल. आणि आणि आव्हानापेक्षा मनोबलाची शक्ती अनेक पटींनी वाढेल. मग आव्हाने कुठूनही ,कधीही आली तरी काहीही पर्वा नाही . एकदाका मनोबलाची कवच कुंडले मिळवली कोणत्याही आव्हानाला आपण स्वीकारू शकतो .सामोरे जाऊ शकतो.

“सो हं ‘   ‘ईश्या वास्य इदं सर्वम’ !

 

शंतनु गुणे