माझे वडील पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्युट “FTI” येथे कामाला होते, अभिनेते राजकपूर पासून व्ही. शांताराम पर्यन्त अनेक फिल्म जगतातील दिग्गज त्यांनी जवळून अनुभवले. त्यांचे अनुभव ऐकतच मोठा झालो. आठवत नाही परंतु समजायला लागल्यानंतर बऱ्याचदा वडिलांकडे कॅमेऱ्यासाठी हट्ट करायचो. मला लहानपणापासूनच कॅमेरा तंत्राचे खूप आकर्षण होते. आत्ता कॅमेरा असता तर मी असा फोटो काढाला असता किंवा तसा फोटो काढाला असता! असे मनात बरेच फोटो काढले पण खऱ्या अर्थाने स्वतःच्या मालकीचा SLR कॅमेरा १९ डिसेंबर १९८९ रोजी आई – वडिलांनी भेट दिला. तिथून आजपर्यंत क्लिक सुरूच आहेत

फोटोग्राफी म्हणजे काय (सामान्यपणे )?

“कॅमेरा” हे टूल वापरून समोरील दृश्य, विषय, ऍक्शन, प्रसंग चित्रित करणे या कृतीला फोटोग्राफी संबोधतात. प्रकाश किरणांच्या साह्याने आकार, रंग, टेक्श्चर, डेप्थ, कंपोझिशन इत्यादी एलिमेंट चा वापर करून दृश्य प्रतिमा चित्रित केली जाते, कॅमेऱ्याच्या साह्याने चित्रित झालेलं दृश्य अनेक वर्ष संग्रहित ठेवता येते. 1839 पासून फोटोग्राफीस सुरुवात झाली. गेल्या १८० वर्षात अनेक प्रयोग फोटोग्राफीत झाले, सामान्य पिनहोल बॉक्स पासून सुरु झालेला कॅमेरा आज मॅजिक बॉक्स झाला आहे.

फोटोग्राफी ही एक सर्वांगसुंदर “कला” आहे जेथे विचारांचा अविष्कार करता येतो. मी चित्रकार आहे, आपले विचार कॅनव्हासवर चितारणे हे माझे मुख्य काम आहे. समोरील दृश्य, व्यक्ती, विचार कागदावर रेखाटणे हि क्रिया बरीच वेळ घेणारी आहे. मनात येणारे विचार लवकरात लवकर दृश्य प्रतिमेत उतरवणे ही माझी गरज होती त्यानुसार विचारांची प्रतिमा लवकरात लवकर चितारण्यासाठी मला कॅमेरा सोयीचा वाटला.

जगात हजारो भाषा बोलल्या जातात, अगदी भारतात ५० मैलावर बोली भाषेत बदल होतो असे म्हटले जाते, परत मुख्य विषय हा आहे की कम्युनिकेशनसाठी आवश्यक भाषा आली पाहिजे, समजली पाहिजे. फोटोग्राफीत मात्र न बोलता आशय विस्तारित करता येतो मूकबधीर बांधवही संवाद साधू शकतात,

१८० वर्ष फोटोग्राफीला झालेत, आज जग कवेत घेणे शक्य झाले ते फक्त फोटोग्राफीमुळेच, आयफेल टॉवर मी अजून पहिला नाही परंतु आयफेल टॉवर वाचल्यावर- ऐकल्यावर एक प्रतिमा माझ्या मनात तयार होते त्याचे सारे श्रेय फोटोग्राफीला जाते आपण क्लिक केलेला फोटो जगात कोठेही पाठवता येतो. एखादा ग्रंथ वाचूनही जो भावार्थ समजत नाही, तोच विषय एखाद्या फोटोग्राफमधून पटकन समजावून सांगू शकतो. शब्द ,भाषा या माध्यमाच्या पलीकडे जाऊन फोटोग्राफीच्या प्रतिमेतुन संवाद साधणे शक्य होते

फोटोग्राफी छंद म्हणून आणि व्यवसाय (करिअर ) म्हणून

पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातुन माझे शिक्षण G D ART अप्लाइड (अभ्यासक्रम कालावधी ५ वर्षे) पूर्ण झाले. स्पेशलायझेशन Advertising Photography या कमर्शिअल अभ्यासक्रमात, जाहिरात कशी करावी, त्याच्या संशोधनापासून ते वापरपर्यंत असणाऱ्या विविध स्थरांचे प्रत्यक्ष शिक्षण दिले जाते, विविध माध्यमांची ओळख त्याच काळात झाली. मी अतिशय कल्पक असल्यामुळे G D ART (अप्लाइड) अभ्यासक्रमात मध्ये बोर्डात १० वा आणि स्पेशलायझेशन advertising photography मध्ये पहिला आलो. त्यानंतर अनेक व्यावसायिक फोटोग्राफीची कामे सुरु केली. कोणत्याही कामात शास्त्रीय शिक्षण घेऊनच व्यावसायिक सुरुवात करावी असा माझा आजही आग्रह आहे.

छंद म्हणून फोटोग्राफी करणे हा खर्चिक उपक्रम आहे. बऱ्याच मर्यादा येतात, हा छंद बऱ्याचदा स्वतःच्या सुखासाठी व इतरांना बरे वाटावे यासाठीच असतो. जसा वेळ व पैसा उपलब्ध होतो त्यानुसार फोटोग्राफीची दिशा ठरवली जाते.  सामान्यतः कॅमेरा व इतर साहित्य यावर फोटोग्राफी कुशलता अवलंबून असते. छंद म्हणून सुरु केलेली फोटोग्राफी ही अशी कला आहे की आपण केव्हा प्रोफेशनल फोटोग्राफर झालो हे लक्षातच येत नाही

प्रोफेशनल फोटोग्राफी ही मात्र एका विशिष्ट हेतूने केली जाते. फोटोग्राफीसाठी छायाचित्रकाराला त्याच्या कामाचे मूल्य दिले जाते. काय ? कसे ? कुणासाठी ? या प्रकारच्या विचारांसोबतच  व्हिजुअल कन्सेप्ट डिझाइन केली जाते, माध्यमकुशल व्यक्ती फोटोग्राफीचे स्वरूप ठरवतात. प्रोफेशनल फोटोग्राफीसाठी अत्याधुनिक कॅमेरे व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर होतो. विविध जाहिरात एजन्सीज, माध्यम समूह आपल्या विषयानुसार फोटोग्राफरची निवड करीत असतात. हे एक कल्पक प्रोफेशन आहे.

पात्रता आणि शास्त्रशुद्ध शिक्षण

कल्पक विचार हे समृद्ध अनुभवातून येत असतात, फोटोग्राफी या कलेची उपासना करता येते, फोटोग्राफी ही जगातील सर्वात लोकप्रिय कला आहे. आजच्या दृश्य माध्यमात सर्वात वरचे स्थान फोटोग्राफीला आहे. ज्यांना स्वतःचे विचार फार कमी वेळात प्रतिमेत रूपांतरित करता येतात, व्यक्त करता येतात अशा सर्वाना फोटोग्राफी करणे सोपे जाते. शिक्षण, सराव, सातत्य व अनुभव यांच्या जोरावर व्यावसायिक फोटोग्राफर होता येते.

छंद म्हणून फोटोग्राफीसाठी शिक्षण, वय, योग्यता यांची कोणतीही अट नाही. परंतु छंद म्हणून फोटोग्राफी करतांना विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश पात्रता संस्थेनुसार, कालावधी नुसार निश्चित केली आहे. काही संस्था १० वी  किंवा १२ वी अशी शिक्षणाची अट ठेवतात. छंद म्हणून फोटोग्राफीसाठी विशेष पात्रतेची आवश्यकता नसते. व्यावसायिक फोटोग्राफीसाठी मात्र शास्त्रीय अभ्यासक्रम पूर्ण केलेला हवा. परदेशातील उच्च शिक्षणासाठी सायन्स विषयातील पदवी असावी लागते.

काही कोर्सेस / ट्रेनिंग

गुरुकुल अथवा मान्यवर छायाचित्रकारांकडे ट्रेनिंग घेणे हा पारंपरिक शिक्षण प्रकार आहे, यातही करिअर प्रमाणे निवड करता येते. सोबतच अनेक फोटोग्राफी स्कुल आहेत, शासकीय अभ्यासक्रम आहेत, पार्ट टाइम कोर्सेस आहेत, ते क्षमतेप्रमाणे निवडता येतात. इंटरनेटवर सर्च करून अनेक संस्थांची माहिती मिळवता येते. व्यावसायिक फोटोग्राफीसाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाची आवश्यकता असते ही बाब अजूनही ग्राहक वर्गापर्यंत पोहचलेली दिसत नाही. भविष्यात मान्यवर संस्थेत अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या छायाचित्रकारास चांगली संधी असेल.

२०२० सालानंतर भारत हा प्रगत व जगातील यशस्वी तरुणांचा देश म्हणून ओळखला जाणार. हा सुवर्णक्षण टिपण्याची गरज लक्षात घेता, अनेक कल्पक फोटोग्राफारची टीम गरजेची आहे. ही टीम घडविणे, अनेक छायाचित्रकार निर्माण करणे, यासाठी २००७ साली भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रत्यक्ष भेटीत मी संकल्प केला. आजपर्यंत ज्यांनी हातात कॅमेरा पकडला नाही अशा व्यक्तींना फोटोग्राफी शिकवणे किंवा नजर आहे परंतु तंत्र अवगत होत नाही तसेच कॅमेरा आहे पण सौंदर्यदृष्टीचा अभाव आहे अशांसाठी जागतिक स्टॅंडर्डने फोटोग्राफी शिकवणे हे आव्हान स्वीकारून मी प्रसाद पवार आर्ट अकॅडमी सुरु केली. त्यात क्रिएटिव्ह कोर्स सुरु केले आहेत. हा कोर्स फोटोग्राफरला स्वयंप्रकाशित करतो. कला, सौंदर्य, तंत्र, आधुनिक कॅमेरे, लेन्सेस यांचे तंत्रशुद्ध शिक्षण देऊन अनेक प्रॅक्टिकल्स घेतले जातात. व्यक्तिमत्व विकास ते कुशल छायाचित्रकार हा प्रवास अनुभवला जातो. व्हिजुअल माध्यमातून प्रात्यक्षिकांसोबत शिकवला जाणारा हा एकमेव पेपरलेस कोर्स आहे.

फोटोग्राफी करण्यासाठी आवश्यक असणारे गुण

व्यावसायिक फोटोग्राफर बनण्यासाठी अभ्यास, संशोधन, आधुनिक तंत्र- शिक्षण महत्वाचे आहे.  कलात्मक दृष्टी, प्रगत तंत्राचे ज्ञान, तासंतास काम करण्याचा संयम, प्रचंड शारीरिक कष्टांची सवय हवी.  जीव, भौतिक,रसायन शास्राचा अभ्यास, आपल्या पंचज्ञान इंद्रियावरील संदेशाचे विश्लेषण करण्याचा सराव. आदी अनेक विषयांचे मूलभूत ज्ञान आवश्यक आहे. शासकीय अभ्यासक्रमात सायन्स व कला विषयात प्राविण्य हवे असते

भारतात फोटोग्राफीचा भविष्यकाळ आणि आव्हाने

फोटोग्राफी हा कल्पक व्यवसाय आहे. या व्यवसायात कल्पनाविस्तार होतो. स्वतःचा फोटो ते प्रोडक्ट फोटोग्राफीपर्यंत अनेक विषय चित्रित करण्यास वाव असतो. जाहिरात फोटोग्राफी हा तर सर्वात जास्त मागणी असलेला विषय आहे. प्रत्येक प्रॉडक्टची प्रोफेशनल फोटोग्राफी करावीच लागते. फोटोग्राफी करवून घेणे व प्रसारित करणे ही न संपणारी भविष्यातील गरज आहे

नवीन खर्चिक अपडेट तंत्रज्ञान स्वीकारणे व कायम कल्पक विचार निर्माण करणे हे फोटोग्राफीसाठी कायमच असलेले आव्हान आहे, कॅमेरा हा संगणक प्रणालीशी निगडित आहे त्यात रोज बदल होतात व सोबतच ग्राहकाची पसंत बदलत असते या दोघांसोबत काम हे आव्हान आहे.

मायक्रो ते इन्फिनिटी असे अनेक विषय आहेत. प्रेस फोटोग्राफी, वास्तुकला, औदयोगिक – प्रोडक्ट, रिसर्च & डेव्हलपमेंट, टूर्स & ट्रॅव्हल, वाइल्ड लाइफ,लग्न समारंभ इत्यादी प्रकारची कामे मिळू शकतात व्यवसाय आणि सेवा दोन्ही प्रकारात काम उपलब्ध आहे.

फोटोग्राफरसाठी USP (वैशिट्य /वेगळेपण) चे महत्व

अनेक फोटोग्राफर स्वतःची वैशिष्ट्ये बनवतात. पोर्ट्रेट, वन्यजीव, प्रवास चित्रण, लँडस्केप, फॅशन, अंडर वॉटर, सिटी स्केप, नाईटस्केप, वॉर, प्रेस, मायक्रो आदी अनंत विषयावर संशोधन करून फोटोग्राफीत कौशल्य मिळवतात आयुष्यभर त्याच विषयासाठी वेळ खर्च करून नवीन प्रयोग करतात त्यांना त्यांच्या विशेष कामासाठी जगभरातून निवडले जाते, उदा. नॅशनल जिओग्राफी – डिस्कव्हरी वाहिनीसाठी …

या क्षेत्रातील स्थिरता आणि सुरक्षितता (पालकांच्या दृष्टिकोनातून)

स्पर्धा ही सर्वच क्षेत्रात आहे. शिक्षणाची आवड नाही, बाकी काहीच येत नाही म्हणून फोटोग्राफीत करिअर करू, कॅमेऱ्याचे बटन दाबले की झाली फोटोग्राफी अशा विचारांच्या सर्वसामान्य व्यक्ती खूप आहेत. कॅमेरा विकत घेऊन ते फोटोग्राफीला सुरुवातही करतात कॅमेरा कसा ऑपरेट करायचा हे शिकतातही परंतु फोटोग्राफी हि एक कल्पक  कला आहे फोटोग्राफीसाठी सौंदर्यदृष्टी महत्वाची आहे आणि प्रत्येक फोटो हा नवीन विचारांचा देता न आल्यामुळे फोटोग्राफीतुन आपोआपच एग्झिट होतात.

अनुभव, अथक परिश्रम, साधना, संशोधन, आधुनिक तंत्र, नाविन्याचा शोध, चॅलेंज स्वीकारण्याची वृत्ती, अभ्यासू वृत्ती, उत्तम आरोग्य, आर्थिक पाठींबा / सधनता या मुळेच फोटोग्राफी व्यवसायात स्थिरता प्राप्त करता येते. आपण फक्त कल्पक काम करायचे – फोटोग्राफी हा एकमेव तंत्र कलाप्रकार आहे  की ज्यात काम, पैसे, समृद्धी, अवॉर्डस, सेलिब्रेटी स्टेटस आपोआप येते.

[

](https://prasadpawarartacademy.com/)फोटोग्राफीत नव-नवीन प्रयोग करा, जगातील विकासाचा प्रत्येक सुवर्णक्षण टिपण्याचा प्रयत्न करा, निसर्ग जपणे , जागतिक शांतता, मानवीय भावना, संस्कृती जपणे, नियम पाळा, सुरक्षा इत्यादी विषयांवर जनहितार्थ काम करून वैश्विक जनजागृतीत योगदान करा ….