मुळात हे क्षेत्रच असे आहे जे तुम्हांला स्वतःकडे एक आकर्षण म्हणून खेचते आणि गोडी लागली की ध्यास होऊन जाते. आणि त्या ध्यासातून मग जे उभे राहते ती असते खरी विशुद्ध कला…खरेतर जे तुम्ही स्वभावतः आहात ते तुमच्या कलेतून पूर्णपणे प्रतिबिंबित होते. परंतु बऱ्याचदा कला तुमचे स्वभाव देखील बदलते.आणि बऱ्याचदा ती तुमचे औषध असते..ते पण बिना साईड इफेक्टसचे..पण अर्थात त्यासाठी तिच्याशी तितकीच एकनिष्ठता लागते. कथ्थक माझ्यासाठी तेच औषध आहे जे मला संजीवनी सारखेच वाटते.
माझ्या नशिबाने मी ह्या क्षेत्रात कलेची साधना गेली १९ वर्षे करत आहे.आता ही १९ वर्षे विद्यार्थी घडवायची पण त्याशिवाय माझ्या आयुष्यात कथ्थक हे तसे माझ्या जन्माच्या आधी पासूनच आले कारण माझी आई सौ रेखाताई नाडगौडा हीच माझी मार्गदर्शक आणि गुरु आहे.. त्यामुळे मला कथ्थकचे बाळकडूच मिळाले.किंबहुना गर्भसंस्कारच झाले असे म्हणायला देखील हरकत नाही.
उत्तर भारतात प्रचलित असणारे हे नृत्य लखनौ,बनारस आणि जयपूर ह्या तीन घराण्यांमधून जोपासले गेले आहे. जसे एखाद्या फुलाच्या रोपट्याचे बीज येन केन प्रकारेन एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊन रुजते आणि तिथून अंकुर फुटून नवीन रोपटे निर्माण होते तसेच काहीसे आज कथ्थक नृत्याचेही झाले आहे.उत्तर भारताइतकेच आज कथ्थकवर काम करणारे अनेकजण भारतात इतरत्र देखील दिसून येतात.महाराष्ट्रात बऱ्याच प्रमाणात कथ्थकचे काम चालू असलेले दिसून येते. आणि आज तर ह्या टेक्नोसॅव्ही दुनियेत पालकांना पण प्रश्न असतो की आपल्या पाल्याला असे कशात गुंतवावे जेणेकरून ते त्याच्या आयुष्याची योग्य वाट सापडून मार्गी लागेल. आणि अशाच कारणाने अनेकजण कलांचा आधार घेतात. आधी घरच्यांनी टाकले म्हणून..नंतर छंद म्हणून आणि त्यात खरच सूर गवसला तर मात्र करियर म्हणून ह्या क्षेत्राचा विचार केला जातो. माझ्या गेल्या १९ वर्षांच्या अनुभवात एक नक्की जाणवले की ज्यावेळी पालक आपल्या मुलाला किंवा मुलीला घेऊन तुमच्याकडे येतात की त्याला किंवा तिला नृत्याची फार आवड आहे आणि त्यासाठी घेऊन आलोय अशावेळी बहुतांश वेळा ते पालक त्यांची राहून गेलेली इच्छा किंवा शेजारच्या,लांबच्या काकुनी तिच्या मुलीला टाकले म्हणून किंवा आत्ता तर ती टीव्ही वर दिसायला हवी म्हणून तिला शिकवायचे आहे असे असतात. त्यात हाताच्या बोटावर मोजता येणारे काही लोक असतात ज्यांना खरोखर त्या कलेची आवड असते.मात्र आज जेव्हा ह्या कथ्थककडे करियर म्हणून पहिले जाते त्यावेळी बरेच संदर्भ बदलतात आणि संधीचा विचार केला जातो.आणि असा विचार करणाऱ्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आज मात्र बऱ्याच संधी उपलब्ध आहेत.
मुळात कथ्थकचे शिक्षण हे गुरु शिष्य परंपरेने घेतले जाते.आणि ह्या शिक्षणासाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाद्वारे परीक्षा घेतल्या जातात.त्याद्वारे तो शिष्य विशारद आणि अलंकारचे शिक्षण पूर्ण करू शकतो. गेल्या काही वर्षांपासून विविध महाविद्यालये, संस्था देखील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवत आहे. आता हे झाले शिक्षणाचे पण प्रत्येकच पालकाला असे वाटते की आपले मूल त्याच्या आयुष्यात स्थिर व्हावे त्यासाठी त्याने नोकरी धंदा पाहावा. तर कथ्थकचे शिक्षण पूर्ण केल्यावर सुद्धा त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. कथ्थकचे पदवी शिक्षण असताना ती व्यक्ती स्वतःची संस्था उभी करू शकते.नृत्यसंरचनाकार म्हणून काम करू शकते.विविध ठिकाणी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सहभागी होता येते. तसेच भारतभर आज असणाऱ्या ह्या परफॉर्मिंग आर्ट्सच्या महाविद्यालयात शिकवता येते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या व्यक्तीला इच्छेनुसार संशोधन करता येते.
हे सगळे झाले स्थैर्यासाठीचे मार्ग परंतु खऱ्या अर्थाने मानसिक स्थैर्य देखील आपल्याला या क्षेत्रात मिळते.नृत्य हे एक प्रकारचे चिंतनाचे साधन आहे…नृत्य हे योग आहे…नृत्य हा सगळ्यात उत्तम आणि प्रभावी व्यायाम आहे…आणि नृत्य हे एक असे औषध आहे जे तुम्हाला शरीराने तर बरे करतेच पण मनाने मोकळे करते. माझ्या अनेक विद्यार्थिनी अशा आहेत ज्या १० वी १२वी सारख्या अनेक परीक्षांच्या काळात नियमितपणे क्लासला यायच्या आणि त्यांना त्या सर्व परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळाले आहेत. मुळात तुमच्या रोजच्या ह्या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला एक कोपरा असा लागतो जिथे तुम्हाला विसावा मिळेल, काहीतरी वेगळे केल्याचा आनंद मिळेल आणि अर्थात तो पण मनाला.. आणि तो त्यांना कथ्थकमध्ये मिळायचा.
रिअॅलिटि शो च्या जमान्यात कथ्थक,भरतनाट्यम असे नृत्यप्रकार ५-६ दिवसात शिकता येतात असे भासवणाऱ्या ह्या आभासी जगात आजही परफॉर्मिंग आर्ट्सच्या शिक्षणातून हा भ्रम दूर केला जातो. आपले संपूर्ण आयुष्य नृत्याला वाहून घेणाऱ्या पं.रोहिणीताई भाटे, पं. शमाताई भाटे,पं.बिरजू महाराज यांच्या त्या तपस्येला योग्य न्याय देण्याचे कार्य आज ललित कला सारख्या महाविद्यालयांनी केल्याचे दिसून येते.कारण संपूर्ण आयुष्य वाहून घेतल्यावर मिळणारे ज्ञान जर ह्या आभासी जगात ५-६ दिवसात मिळते असे सांगून ते जनसामान्यांच्या मनात बिंबवले गेले तर ते योग्य होणार नाही.आणि कला हे आज असे क्षेत्र आहे ज्यात भारतीय शिक्षण पद्धतीचे मूळ स्वरूप म्हणजेच गुरु शिष्य परंपरा टिकून आहे.आणि त्याचमुळे आज परदेशातही ह्या कलांचा विकास होताना ह्या शिक्षण पद्धतीचाच अवलंब केलेला दिसून येतो.
आजच्या तरुणपिढीने ह्या कलांच्या संवर्धन आणि विकासासाठी एक गोष्ट आवर्जून करावी असे मला वाटते की त्यांनी ह्या कलांचा मूळ गाभा समजून घेऊन त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपाला न बदलू देता पाया तोच पण तुमच्या नवनवीन संकल्पनांच्या मनोऱ्याने सजवून जिवंत ठेवले पाहिजे.आणि सगळ्यात अवघड पाया ढासळू न देणेच असते.त्यामुळे तेच त्यांच्यासाठी आव्हानात्मक आहे.
नृत्य हे माझ्यासाठी सृजनत्वाचे प्रतिक आहे.एखादी संकल्पना नव्याने सुचते ,तेव्हा एखाद्या आईला तिच्या नवजात बालकाला पाहिल्यावर जो आनंद होतो तसाच मलाही माझी ती संकल्पना साकारल्यावर होतो. एका नृत्यांगनेला अथवा नर्तकाला ज्यावेळी त्या रंगमंचावर सादरीकरणाची सवय होते त्यावेळी आपोआपच ते कोणत्याही प्रसंगात उभे राहायला सक्षम असतात असे मला वाटते. कारण एवढ्या मोठ्या जनसमुदायाला सामोरे जायला शिकल्यावर त्या व्यक्तीचा विकास हा चहूबाजूंनी होतो.कारण ते केवळ सामोरे जाणे नसून त्यात एक मूकसंवाद असतो जो तुमच्या देहबोलीतून घडतो आणि त्याच माध्यमातून तो समोरच्या व्यक्तीच्या हृदयाला जाऊन भिडला तरच तिथे संवाद पूर्ण होतो.अगदी गम्मत सांगायची झालीच तर एका नर्तकाला बोलण्यापासून कपड्यांपर्यंत कसे असावे हे शिकवावे लागत नाही.ती कला तुम्हाला आपसूकच शिकवून जाते. त्यामुळे कला ही माणसाचा सर्वांगीण विकास करते.आणि असे अनेक कलाकार घडवण्याचे भाग्य आम्हाला मिळते यात आम्हाला अतिशय समाधान वाटते.
*[
<noscript> <img class="alignleft size-thumbnail wp-image-4001 portfolio-lazyLoad" src="https://www.jagarmanacha.in/wp-content/uploads/image-2-150x150.jpeg" alt="" width="150" height="150" srcset="https://www.jagarmanacha.in/wp-content/uploads/image-2-150x150.jpeg 150w, https://www.jagarmanacha.in/wp-content/uploads/image-2-300x300.jpeg 300w, https://www.jagarmanacha.in/wp-content/uploads/image-2-60x60.jpeg 60w, https://www.jagarmanacha.in/wp-content/uploads/image-2.jpeg 640w" sizes="(max-width: 150px) 100vw, 150px" /> </noscript>](https://facebook.com/aditipanse)आज मी माझ्या आईचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे.पण मला वैयक्तिक असे वाटते की मुलांनी हेच करावे हेच करू नये असे म्हणण्यापेक्षा त्याला काय आवडते त्याचा विचार करून आई वडिलांनी त्याला त्या दिशेने प्रोत्साहन द्यावे .कदाचित तो एक चांगला डॉक्टर,इंजिनिअर,वकील होऊन जे कमावेल अशी स्वप्न तुम्ही पाहत आहात त्यापेक्षा त्याने त्याला आवडते असे एखादे क्षेत्र निवडून त्याच गोष्टी स्वतःच्या आनंदसह घडवून आणल्या तर ते तुम्हाला आणि त्याला दोघांना आनंद देणारे आणि समाधानाने आयुष्य जगवणारे असू शकते.आणि ह्या छोट्याश्या स्वातंत्र्यानेच बऱ्याचदा इथे तुमच्या नात्याची विण अधिक घट्ट होते.