पूर्वी ज्या व्यक्तिमत्वात काहीही अर्थ नाही अश्यांना नर्मदेतला ‘गोटा’ म्हणण्याची पद्धत होती .पण ती फारच चूक होती. कारण ज्या शक्तिमान प्रवाहात अनेक सर्वसामान्य दगडांचे भुसकट होऊन जाते, त्याच प्रवाहाला काही दगड पुरून उरतात. नुसतेच पुरून उरत नाहीत तर त्या प्रवाहाच्याच शक्तीचा वापर करून घेत, आपल्यातले अवगुणांचे, अहंकाराचे अनावश्यक कंगोरे नष्ट करून ‘शाळीग्राम’ बनतात. त्यांची ही साधना कोणाचेही लक्ष वेधून कौतुकाची थाप पाठीवर पडून घेण्यासाठी नसते . वा कोणतातरी पुरस्कार मिळविण्यासाठी चाललेली नसते. त्यांची ही साधना फक्त स्वत:त दडलेले जे उत्तम आहे ते प्रकट करण्यासाठी चाललेली असते. ही कुणा इतरांशी स्पर्धा नसते तर स्वत:शीच असते. ही साधना कुठे चालली असते? तर जिथे कुणाचेही लक्ष जाणार नाही अश्या ठिकाणी, कशी चालली असते? तर अत्यंत आनंदाने ,आहे ती परिस्थिती स्वीकारत. किती काळ चालू असते? तर अखंड, अव्याहत हजारो वर्षे ! अगदी शेवटचा, अगदी पुसटसासुद्धा कंगोरा नष्ट होई पर्यंत. आणि जेव्हा हे घडते तेव्हा त्या सर्वसामान्य दगडाचे ‘शाळीग्रामात’ परिवर्तन झालेले असते. आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी नर्मदेचा पवित्र पण शक्तिमान प्रवाह खंबीरपणे झेलत , स्वीकारत त्यांना हे देवत्व प्राप्त झालेले असते. माणूस त्यांना ‘देवाचा’ मान देतो. त्यांना पूजतो. कारण त्यांची साधनाही ‘उत्तमाची’ साधना असते. आणि त्या साधनेतून सर्वसामान्य माणसाच्या बुद्धिपलीकडले असे काहीतरी घडलेले असते. गंमत म्हणजे आपणाला ‘शाळीग्रामत्व’ प्राप्त होणार आहे  हे किंवा झाले आहे त्या दगडांनादेखील माहित नसते. कष्टांचे पहाड उपसत अहोरात्र संगीताची उपासना करणाऱ्या पं. भीमसेनजींना तरी कुठे माहित होते की उद्या ते संगीतातले देव गणले जाणार आहेत म्हणून? समजायला लागलेल्या वयापासून, क्रिकेटचे असिधाराव्रत घेत खेळणाऱ्या सचिनला तरी कुठे माहित होते की प्रत्येक भारतीयाच्या हृदयातला तो क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट होणार आहे म्हणून? अनेक यशापयशाला सामोरे जात आपल्यातल्या अभिजात नटाला उत्तुंग उंचीवर नेणाऱ्या अमिताभला तरी कुठेमाहित होते की तो लक्षावधी भारतीयांच्या मनातला ताईत होणार आहे म्हणून!

तसे ते कोणत्याच उत्तमाच्या साधकाला माहित नसते. मग तो निसर्गातला असो वा माणसातला असो. कारण साधनेचा मुळात हेतूच तो नसतो. साधने मागचे उद्दिष्टच ते नसते. मग काय असते या साधनेमागचे उद्दिष्ट ? “जे क्षेत्र, जी भूमिका आम्ही स्वीकारली आहे किंवा स्वीकारावी लागली आहे तिथे उत्तमाच्या ध्यासाने झपाटून जाऊन, तिथले अत्युच्य शिखर गाठण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन, पूर्णपणे झोकून देत, जगण्याचा यथेच्च्य आनंद घेणे आणि आपला जन्म सार्थकी करत, कर्तृत्वाचा उत्तुंग वारसा निर्माण करणे” हे असते ते उद्दिष्ट. आणि जी माणसे या अश्या उद्दिष्टासाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने ‘सकारात्मक’ असतात.

बहुतांशी माणसांना ‘आम्ही काय बाबा ,सर्वसामान्य, तुम्ही काय बाबा ‘असामान्य’ अशी लेबल्स लावायची सवय असते. कारण एकदाही लेबल्स लावली की पुढचे सर्व काम सोपे होऊन जाते. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या लेबल्स प्रमाणे वागावे. सामान्यांनी असामान्य होण्याचा प्रयत्न करू नये. आणि असमान्यांनी त्यांच्यातले सामान्यत्व कधी उघड करू नये. अश्या लेबल्स मधूनच कधीच न पुसली जाणारी जातीव्यवस्था उभी राहिली आणि सारा समाज या लेबल्सचा गुलाम होऊन गेला.

खरे तर आपल्यातले ‘असामान्यत्व’ हे आपल्याच अंतरंगात असते. फक्त बहुतांशी व्यक्तिमत्वांत ते आपल्याच उणिवांच्या गराड्यात हरवून गेलेले असते. आपल्या बद्दलच्या, जीवनाबद्दलच्या गैरसमजुतींच्या दबावाखाली दबले गेलेले असते. सुखाच्या, चंगळवादाच्या भोगात त्याचे तेज केविलवाणे होऊन गेलेले असते. दोनवेळचे खायला मिळते आहेना? निवारा आहेना ? कामशांती होते आहेना? मुलभूत गरजा भागता आहेत ना? मग अजून काय पाहिजे या विचारांमध्ये प्रत्येकाच्या ठायी असलेले असामान्यत्व कोमेजून जाते. सर्वसामान्य व्यक्तिमत्वे ते शोधायच्या ,त्याला ओळखायच्या, त्याला तिथून बाहेर काढायच्या भानगडीत पडतच नाहीत आणि असामान्य व्यक्तिमत्वे त्याला शोधल्याशिवाय राहत नाहीत. एवढाच काय तो सामान्य-असामान्यातला फरक. कर्तृत्ववान व्यक्तिमत्वे आपल्यात दडलेल्या गुणांनाही ओळखतात आणि त्याबरोबर आपल्यातल्या उणिवांनाही. थोडक्यात त्यांना शिल्पकाराची दृष्टीप्राप्त झालेली असते. म्हणजे जेव्हा शिल्पकाराला एखाद्या दगडातून मूर्ती निर्माण करायची असते तेव्हा त्याला फक्त त्यामूर्तीच्या आड येणारा दगड दिसत असतो. त्या आणि तेवढ्याच भागावर तो अत्यंत डोळसपणे छिन्नीचे घाव घालत मूर्तीच्या आड येणारा दगडाचा अनावश्यक भाग काढून टाकतो. मूर्ती प्रकट होते. पण बहुतांशी माणसे अश्या असामान्य कर्तृत्वांना अत्यंत सहजपणे ‘देवपणाचे’ लेबल बहाल करून त्यांच्यातल्या संघर्षाकडे, प्रयत्नांकडे, उद्दिष्टांकडे डोळेझाक करतात. कारण एकदा हे देवपण बहाल केले की आपले हात फक्त नमस्कार करायला, कुर्निसात करायला मोकळे. आपली बुद्धी फक्त त्यांच्या देवत्वाच्या आरत्या ओवाळायला मोकळी आणि आपली वाणी फक्त त्यांचे गोडवे गायला मोकळी !

उत्तमाच्या ध्यासात दडलेली बीजात्मक ‘सकारात्मकता’ रुजवण्यासाठी, फुलविण्यासाठी ती प्रत्यकेक्षणी ‘जगावी’लागते याकडे आज बहुतांशी समाजाचे लक्ष नाही. परमपूज्य विमलताई ठकार म्हणतात  ‘जाणलेले जगणे’ हीच खरी परिवर्तनाची, उत्तमाची साधना आहे. Excellence ची पूजा आहे आणि निसर्गाचा प्रत्येक घटक मग तो सजीव असो वा निर्जीवअसो, त्याची उत्तमाची पूजाही प्रत्येक क्षणी चाललेली असते. सहजपणे, सतत आणि सरळपणे ! “जे सहज आहे , सतत आहे आणि सरळ आहे ते सत्य आहे, तेच उत्तम आहे, तेच सुंदर आहे .”  आणि जो उत्तमाचा साधक तोच खऱ्या अर्थाने ‘सकारात्मक’ आहे. उत्तमाच्या आविष्काराला कोणत्याही शब्दात व्यक्त करतायेत नाही.

साऱ्या वातावरणाला भारून टाकणाऱ्या मातीच्या सुगंधाला कुठल्या शब्दात व्यक्त करणार?
सचिनच्या स्ट्रेटड्राईव्हचा डौल कोणत्या शब्दात मांडणार?
बेभानपणे डोंगरकड्यावरून झोकून देणाऱ्या पाण्याच्या समर्पणाला कोणते शब्द पुरे पडणार?
चित्रकाराच्या बोटातली अनुपम लय कोणत्या शब्दात पकडणार?
नाहीच पकडता येणार.
कारण ‘उत्तम’ हे शब्दांच्या पलीकडेच असते. ते फक्त अनुभवायचेच असते.
आणि जमलेच तर त्या अनुभवण्यातून खूप काही शिकायचे असते.
पावसाचे कोसळणे, समुद्राचे उसळणे आणि कळीचे उमलणे आम्ही अनुभवतो आणि म्हणतो
बाबारे, तूच करता आणि तूच करविता !
पण मग असे म्हटले की मग शिकण्याचा काही प्रश्नच नाही.
कुसुमाग्रजांच्या शब्दांच्या चांदण्यात,भीमसेनजींच्या सुरांच्या सागरात आपण डुंबतो.
ज्ञानेश्वर माउलींच्या पसायदानाच्या जीवनस्पर्शी प्रतिभेला आम्ही शरण जातो.
पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले, बाबा आमट्यांच्या जीवनदायी कर्तृत्वापुढे आम्ही नतमस्तक होतो.
अब्दुल कलामांच्या visionary दृष्टीकोनाने आम्ही स्तिमित होतो.
आम्ही हे मनापासून मान्य करतो की यांच्या उत्तमाच्या साधनेने आमच्या जीवनात

शंतनु