आजच्या काळात राजनेत्याला त्याची प्रतिमा उंचावणारं भाषण करण्यासाठी शब्दांकन करून देणं असो किंवा एखाद्या कंपनीची वेबसाईट बनवताना त्या कंपनीची माहिती शब्दबद्ध करून इंटरनेटच्या माध्यमातून सहजरित्या ती हजारो-लाखो लोकांपर्यंत पोचवणं असो. यासारख्या एक नाही तर अनेक ठिकाणी चांगल्या “कॉन्टेन्ट व कॉपी रायटर” ची गरज नेहमीच भासत असते. विविध वेबसाईट डिझायनिंग कंपनीज आणि advertising एजन्सीज मधून कायमच चांगलं लिखाण करणाऱ्या लोकांना मागणी असते. याच “वेगळ्या वाटेवरच्या ” क्षेत्राविषयी थोडसं..

२०१४ साली नरेंद्र मोदींचे “सबका साथ , सबका विकास” कॅम्पेन असो किंवा महाराष्ट्रातील निवडणूकीत “परिवर्तन तर होणारच !” सोबत मुखमंत्र्यांची प्रतिमा जोडलं जाणं असो ही कॅम्पेन्स जरी वरकरणी राजकीय पक्षांची वाटत असली तरी त्यामागे उत्तम शब्दांकन करणाऱ्या लोकांसोबत मिडीया क्षेत्रातील एक मोठी फौज २४ तास कार्यरत होती हे आजच्या घडीला विसरून चालणार नाही. रेडिओ आणि टिव्ही एवढ्यापुरतं मर्यादित न राहता सोशल मिडीया आल्यापासून तर मिडीया क्षेत्राला मोठी मागणी आली आहे.

बरेचवेळा लेखन म्हणले की मालिका व चित्रपटांसाठीचे लेखन एवढा एकच साचेबद्ध व आकर्षित करणारा पर्याय मुलांना आणि त्यांच्या आई-वडीलांना माहित असतो पण लेखनाचे क्षेत्र या ही पेक्षा खूप मोठे आहे व इतर क्षेत्रांप्रमाणेच सुरक्षित भविष्य देणारे ही आहे हे आज लक्षात घ्यायला हवे.

वेबसाईटसाठी चे लिखाण, एखाद्या उत्पादनासाठीच्या जाहिरातीचे लिखाण, सोशल मिडिया वरील जाहिरातींचे लिखाण यासारखी विविध कामे “कॉन्टेन्ट व कॉपी रायटर” नी आपल्या क्लायंट च्या गरजा ओळखून पूर्ण करणे अपेक्षित असते.या पद्धतीचे लिखाण करताना समोरच्या वाचणाऱ्या किंवा पाहणाऱ्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेता येणं हे जास्त महत्वाचं…

आजकाल सोशल मिडीया च्या माध्यमातून केल्या गेलेल्या जाहिराती किती लोकांपर्यंत पोचतायत आणि किती लोकांना आवडतायत याची माहिती लाईक्स आणि views च्या माध्यमातून ठेवणं अतिशय सोपं झालं आहे. त्यामुळे आज लेखकाने लिहिलेल्या जाहिरातीचे लगेच मूल्यांकन केले जाऊ शकते.

मूळात लेखन ही कला आहे आणि त्यामुळे त्याला कुठल्या एकाच अभ्यासक्रमाच्या शाखेत बांधून अमुक एक कोर्स करून कोणी उत्तम कॉपी किंवा कॉन्टेन्ट रायटर बनेल असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. मात्र भाषेची उत्तम जाण असलेल्या विद्यार्थ्याला जर मास मिडीया व जर्नालिझम (पत्रकारिता) चा कोर्स करण्याची संधी मिळाली तर त्याचे लेखन यानिमित्ताने अधिक समृद्ध होईल.

कॉपी किंवा कन्टेन्ट रायटर म्हणून यशस्वीपणे काम करण्यासाठी हे गुण लेखकात हवेतच –

  1. भाषेचा योग्य ठिकाणी योग्य वापर करता यायला हवा. उदाहरणार्थ – एखाद्या धार्मिक सोहळ्याची माहितीपूर्ण पोस्ट बनवून अपलोड करताना त्या पोस्टमध्ये भावनात्मक शब्दांचा वापर करून लोकांना जाऊन भिडेल असे लिखाण हवे. याउलट एखाद्या राजकीय पक्षाचे कॅम्पेन करताना विरोधकांना गारद करेल आणि आपल्या क्लायंटच्या पक्षाची प्रतिमा उंचावेल असे लिखाण जाहिरातीतून प्रकट होणे आवश्यक असते.
  2. जाहिरात लिहिताना किंवा क्लायंटसाठी ब्लॉग लिहिताना कमीत कमी शब्दांचा वापर नेहमीच फायद्याचा ठरतो त्यामुळे कमीतकमी शब्दात हवी ती गोष्ट पोचवण्याचा सराव असायला हवा. वर्तमानपत्रात इंटर्नशिप करता आली तर हा अनुभव विद्यार्थी सहज घेऊ शकतात कारण वर्तमानपत्रात जागेअभावी बरेचवेळा शब्दांवर मर्यादा आल्यामुळे कमी शब्द वापरून माहिती पोचवण्याची सवय लागते.
  3. अनेक ठिकाणी जिथे सर्वसामान्य लोकांपर्यंत जाहिरात पोचणार असेल तिथे साध्या व सोप्या भाषा शैलीचा उपयोग करणे कधीही प्रभावी ठरेल.आपण केलेली जाहिरात समाजातील कुठल्या वर्गापर्यंत पोचणार आहे त्याचा विचार करून लिखाण करणे आवश्यक आहे.

या वरील मूलभूत गोष्टींचे भान एकदा “कॉन्टेन्ट व कॉपी रायटर” म्हणून बाळगले की पुढील वाटचाल करणे सोपे जाते.

या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कुठला कोर्स निवडावा किंवा कुठलं कॉलेज निवडावं याबाबतीत इंटरनेट च्या माध्यमातून एका क्लिकवर माहिती अगदी सहज उपलब्ध होऊ शकते त्यामुळे त्यावर अधिक बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की संबंधित कोर्स करताना केवळ मार्कांच्या पाठीमागे न लागता विद्यार्थ्यांनी यादरम्यान भविष्यातील संधींचा वेध घेऊन इंटर्नशिप च्या माध्यमातून काम करण्यासाठी नक्की प्रयत्न करावा. विद्यार्थी आहात म्हणून यादरम्यान कदाचित मिळणारा स्टायपेंड कमी ही असू शकतो पण विद्यार्थी दशेत मिळणारा अनुभव तुम्हाला भविष्यात या क्षेत्रात नक्कीच चांगल्या संधी खुल्या करून देऊ शकतो.

माझा अनुभव सांगायचा झाला तर विद्यार्थी दशेतील महाराष्ट्र टाइम्स चा कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून मिळालेला दोन वर्षांचा अनुभव मला खऱ्या अर्थाने समृद्ध करून गेला. ‘मटा’ च्या याच अनुभवाला ‘एम.ई.टी’कॉलेजमधील “उत्सव”च्या अनुभवाची ही जोड मिळाली. ज्यामुळे लिखाणासोबत आपण करत असलेले काम “मॅनेज” करण्याचे ही बाळकडू मला यानिमित्ताने मिळाले. इंजिनिअरिंग सोबत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून केलेला मास मिडीया व जर्नालिझमचा डिप्लोमा कोर्स ही माझ्या करियर मध्ये कलाटणी देणारा ठरला. त्यामुळे पदवी मिळाल्यावर काम शोधायला सुरवात करू किंवा कॅम्पस इंटरव्यू मधून प्रयत्न करू असा चुकीचा ग्रह बाळगण्यापेक्षा शिकता शिकता काम करून, अनुभव मिळवून जर करियर चा पाया रचता आला तर अधिक चांगले.

[

](https://www.facebook.com/amogh.ponkshe?fref=ts)भारतात झपाट्याने होणारी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती मिडीया क्षेत्राला पोषक असल्यामुळे “कॉपी आणि कन्टेन्ट” लेखन क्षेत्रात ही मोठ्या संधी आज उपलब्ध आहेत असे असले तरी आजही बहुतांशी पालक मिडीया किंवा मनोरंजन क्षेत्राकडे अस्थिर क्षेत्र म्हणून पाहतात. पण अस्थिरतेचे कारण पुढे करून या क्षेत्राबाबत पालकांनी भिती बाळगण्याचं काही कारणच नाही. उलट वेगळी निवडलेली वाट त्या “लेखकाला” समाजात आज एक “वेगळाच” मान मिळवून देते हे नक्की…