माणसाचे मन कोणतीही शिस्त लावून घ्यायला तयार नसते. मनालाच शिस्त नसली तर ती शरीराला कशी लागेल? वास्तवात जगणे दिवसेंदिवस अवघड होत जाते, मग स्वप्नात व आळसात जगणेच आवडायला लागते. आपण सर्व श्रेष्ठ आहोत, आपल्याला सर्वांनी मान द्यावा, आपले म्हणणे ऐकावे, आपल्याला यश-कीर्ती-सत्ता -संपत्ती यांचा लाभ व्हावा या साऱ्या सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात असतातच. वास्तवात त्यासाठी तप, त्याग, अविश्रांत कष्ट करावे लागतात. ते तर मुळीच आवडत नाही. मग स्वप्नातच या साऱ्या गोष्टी आपण मिळवल्या आहेत असे पाहत राहणे सोयीचे वाटते. काहीही मनाविरुद्ध घडले की संताप होतो, चिडचिड होत राहते, चित्ताची प्रसन्नता नाहीशी होते. मग दुःखच दुःख वाट्याला येते. आपले नशीबच फुटके आहे, असा पक्का गैरसमज होतो. जे कर्तबगारीने आपल्या पुढे निघून जातात त्यांच्याबद्दल ईर्षा, द्वेष, मत्सर वाटायला लागतात, पण त्याचा काही उपयोग नाही हे जाणवायला लागते आणि माणूस व्यसनाकडे वळतो.
बालपणापासूनच मनाला शिस्त लावण्याची सवय पडलेली नसली तर ज्ञानदेवांच्या शब्दात ‘ते देखल्या ठायी सवकते.’ म्हणजे आपल्या आवडीच्या वस्तू दिसल्या किंवा नुसत्या आठवल्या तरी ते त्यात गुंतून पडायला लागते. आपल्या आयुष्यात काही घडवायचे असेल तर त्याची ही सवय निग्रहाने मोडून काढायला हवी. जे घडले आणि घडणार आहे त्याच्यापेक्षा आता या क्षणाला जे घडत असेल तेच अत्यंत महत्त्वाचे असते. पण स्वप्नरंजनातच गुंतून पडल्याने आता काय होते आहे आणि काय करायला हवे आहे त्याचे भानच राहत नाही. मग भलतेच प्रतिसाद यायला लागतात. अपघात घडतात आणि आपण असे मूर्खासारखे कसे वागलो याचे नवल वाटत राहते. हे सारे घडायला आपणच जबाबदार आहोत हे मान्य करायची तयारी नसते. मग त्याचा दोष दुसऱ्या कोणावर तरी थापायचा प्रयत्न सुरू होतो. आपल्या आसपास अशा अनेक व्यक्ती वावरताना दिसतात आपल्याला. कठोर आत्मपरीक्षण केल्याशिवाय आपणही असे वागतो आहोत का ते कळतसुद्धा नाही.
काही वेळा तर आपल्या क्षेत्रात चांगले यश आणि कीर्ती मिळवणाऱ्या माणसांनासुद्धा असा त्रास होऊ शकतो. आपण सर्वश्रेष्ठ आहोत, असा विचार मनात रुजला की घसरण सुरू होते. खेळाडू आणि विद्यार्थी यांच्याबाबतीत बऱ्याच वेळा असे घडू शकते. सर्वच क्षेत्रांत नवी गुणवत्ता उदयाला येत राहते आणि आपण ज्यांना मागे टाकलेले असते तेही सराव आणि प्रशिक्षणाने आपला दर्जा वाढवण्याचा सतत प्रयत्न करतच असतात. त्यामुळे आपल्याला आपण सर्वश्रेष्ठ आहोत हे गृहीत धरून चालत नाही. मागल्या परीक्षेच्या वेळी किंवा मागल्या स्पर्धाच्या वेळी आपण सर्वश्रेष्ठ ठरलो असलो तरी ती श्रेष्ठता आपल्याला दरवेळी सिद्ध करावी लागते, तरच आपले सर्वोत्तम स्थान आणि ती पदवी टिकून राहते. तुमचे ज्ञान, कौशल्य, डावपेच हे काळाच्या कसोटीवर प्रत्येक वेळी घासून सिद्ध करून दाखवण्याची जबाबदारी आपली असते. आता जसे वय वाढत जाईल तशा आपल्या जबाबदाऱ्याही वाढत जातात. जोडीदार सापडून विवाह होतो, मुलेबाळे होतात, अर्थार्जनाची जबाबदारीसुद्धा वाढते. मग आपल्या अंगावर घेतलेल्या इतर भूमिकाच आपल्या मनाला वर्तमानाच्या चौकटीतून बाहेर खेचून नेतात. ऐनवेळी आपल्या कर्तबगारीबद्दल मनात संशय उभा राहतो. हा संशयच मनाची पकड घेतो आणि घसरणीला सुरुवात होते. या वर्षी विम्बल्डन टेनिस स्पर्धात पुरुषांमध्ये जोकोविक आणि महिलांमध्ये सेरेना विल्यम्स यांना मानांकनात पहिला क्रमांक मिळालेला होता. जोकोविक मानांकनाला साजेसा खेळ करू शकला नाही आणि तो उपांत्य फेरीतच राओनीच या मानांकनात बऱ्याच खाली असलेल्या खेळाडूकडून हरला. सेरेना विल्यम्सने मात्र जरुरीप्रमाणे आपला खेळ उंचावला आणि तिने किताब जिंकला. संशयपिशाच्चाने पछाडलेल्या किंवा इतर भूमिकांच्या विचाराने एकाग्रता हरवून बसलेल्या मनाला ताळ्यावर आणण्याचा एक हुकमी उपाय आहे. मनाचाच एक भाग संशय निर्माण करून त्याच्या बाजूचे विचार बलवान करायला लागतो किंवा इतर भूमिकांत रममाण होण्याचा प्रयत्न करतो. त्याला ताबडतोब गप्प राहण्याचा हुकूम सोडायचा. लगेच श्वासावर पूर्ण लक्ष आणून बाहेर श्वास एक-दोन सेकंद रोखण्याचा प्राणायाम एकदा किंवा दोनदा करायचा. मग आपल्या तंत्राचे डावपेचाचे विचार मनात घोळवायला सुरुवात करायची. हे केल्याबरोबर नाहीशी झालेली एकाग्रता लगेच सापडते आणि उत्कृष्ट कामगिरी व्हायला लागते. भूमिकेतला बदल उत्तम प्रकारे अमलात आणून नव्या भूमिकेशी एकाग्र होण्यासाठी श्वासावर एकाग्र होत त्यावर नियंत्रण आणणे अतिशय प्रभावी ठरते. मात्र, त्यासाठी प्राणायामाचा अभ्यास नियमित करत राहणे आवश्यक असते. फार नाही तरी रोज दहा ते पंधरा मिनिटे प्राणायामाचा अभ्यास करण्याने ही एकाग्रतेची शक्ती कित्येक पटींनी वाढते. क्रीडा क्षेत्रातल्याच नव्हे, तर इतर क्षेत्रातल्याही प्रथितयश व्यक्तींनी आणि परीक्षेत उत्तम यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे. हा तसा सोपा प्रयोग सर्वांनीच करून पाहावा, मात्र सराव आणि प्रयत्नांचे तप चालूच असायला हवे. हा त्याच्यासाठी पर्याय नाही एवढे ध्यानात ठेवायला हवे.
योगशास्त्र अभ्यासक
bpbam.nasik@gmail.com